एम्प्रेस गार्डनमध्ये वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण   

पुणे : एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनातर्फे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्या साधत एक दुर्मिळ व आकर्षक वृक्ष अर्थात उर्वशी वृक्षाचे रोपण करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षा सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मानद सचिव सुरेश पिंगळे, यशवंत खैरे, वनस्पती तज्ञ प्रा.श्री. द. महाजन, श्रीकांत इगळहळीकर,शर्वरी बर्वे, प्रशांत चव्हाण यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.यावेळी शिवण, पिवळा कांचन, सोनचाफा, तामन, शेंदरी आदी वृक्षाचे रोपण करण्यात आले.
 
उर्वशी वृक्ष मूळचा म्यानमार येथील असून, जगातील हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा अतिसुंदर वृक्षांमध्ये त्याचा वरच्या क्रमांकावर गौरवाने उल्लेख होतो. अम्हर्स्टिया नोबिलिस हा सदाहरित वृक्ष आहे आणि त्याच्या विलक्षण सौंदर्यामुळे ‘उर्वशी वृक्ष’ म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. एम्प्रेस गार्डनच्या या उपक्रमाचाही उद्देश पर्यावरण पूरकतेस प्रोत्साहन देणे, दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणे व नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक सकारात्मक अनुभव देणे हा आहे. बागेमधील सौंदर्य व नैसर्गिक रचना अबाधित ठेवत, अशा दुर्मिळ वनस्पतींचे संकलन व रोपण करण्याचे काम संस्थेने सातत्याने चालू ठेवले आहे.
 
एम्प्रेस गार्डन हे केवळ वनस्पतीप्रेमींसाठीच नव्हे, तर पर्यटन व कुटुंब सहलीसाठीसुद्धा एक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. बागेतील निसर्गरम्य व शांत वातावरण, सुसज्ज बसण्याची व्यवस्था व वाहत्या पाण्याच्या स्रोतांनी या ठिकाणाचे महत्व अधिकच वाढवले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एम्प्रेस गार्डनने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.

Related Articles